बेकायदेशीर गौणखनिज उत्खनन केले बाबत ग्रो इंडिया रेसिडेन्सी प्रा लि यांना ९ कोटींचा दंड
अपना वतन संघटनेचे "गोट्या भेट" आंदोलन स्थगित.
अल्ताफ शेख ✍️: एस के एफ कंपनीसमोर, सर्व्हे नं १६९/१, याठिकाणी ग्रो इंडिया रेसिडेन्सी प्रा. लिमिटेड यांचेकडून, सोनिगरा द मार्क या प्रकल्पासाठी बेकायदेशीर गौणखनिज उत्खनन व वाहतूक केलेबाबत गौणखनिज उत्खनन फोटो व गौणखनिज वाहतूक करतानाचे व्हिडीओ सोबत जोडून दिनांक २७/१२/२०२३ रोजी अपना वतन संघटनेचे अध्यक्ष श्री सिद्दीकभाई शेख यांनी मा. अप्पर तहसीलदार, पिंपरी चिचंवड यांच्याकडे तक्रार केलेली होती. सदर बाबत तहसीलदार कार्यालयाकडून दुर्लक्ष झाल्याने दिनांक ७/०८/२०२४ रोजी अपना वतन संघटनेच्या वतीने तहसीलदार कार्यालय याठिकाणी गोट्या भेट आंदोलन करण्यात येणार होते. परंतु तहसीलदार जयराज देशमुख यांनी आंदोलनाची दखल घेत सकारत्मक चर्चा केली. यावेळी बेकायदेशीर गौणखनिज उत्खनन व वाहतूक केलेबाबत ग्रो इंडिया रेसिडेन्सी प्रा. लि यांना ९ कोटींचा दंड केल्याचा आदेश काढला. तसेच मंडलाधिकारी व तलाठी यांना कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी नोटीस काढून खुलासा मागवण्यात येईल व बिल्डरांवर गुन्हा दाखल करणेबाबत कायदेशीर सल्ला घेऊन पुढील कारवाई करण्याचे आश्वासन अपना वतन संघटनेचे अध्यक्ष सिद्दिक शेख यांना दिले. यावेळी गोट्या भेट आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले. यावेळी अपना वतन संघटनेचे कार्याध्यक्ष राजू शेरे, सचिव दिलीप गायकवाड, महिलाध्यक्ष राजश्री शिरवळकर, शहर प्रभारी जितेंद्र जुनेजा, नयूम पठाण, संघटक गणेश जगताप, तौफिक पठाण, किरण जगताप, जमील शेख, संतोष सुतार, कुदरत खान यांच्यासहित अनेक कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी होते.