E-Paperमहाराष्ट्रराज्यलोकल न्यूज़
भर आखाड्यात कुस्ती चालू असताना पै. सिकंदर वर उचलला हात,पुण्यात मुळशी मध्ये कुस्तीला गालबोट.
भर आखाड्यात कुस्ती चालू असताना पै. सिकंदर वर उचलला हात,पुण्यात मुळशी मध्ये कुस्तीला गालबोट.

दिनांक १७ फेब्रुवारी २०२६: कुस्ती स्पर्धेदरम्यान सिकंदर शेख आणि माऊली कोकाटे यांच्यात झालेली झुंज जवळपास एक तास रंगली. दोन्ही पैलवानांनी अत्यंत ताकदीने आणि जोमाने कुस्ती खेळत प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले. आखाडा रंगात आला असताना आयोजकांकडून वारंवार जाहीर करण्यात येत होते की निकाल लागेपर्यंत कुस्ती सोडवली जाणार नाही. समालोचकांनीही दोन्ही पैलवानांना खेळाची गती वाढवण्याचे आवाहन केले होते. मात्र दीर्घ काळानंतरही कोणताही स्पष्ट निकाल लागत नव्हता आणि दोघेही एकमेकांना तगडी झुंज देत होते.
सुमारे तासभरानंतर झुंज अधिक चुरशीची झाली. या दरम्यान माऊली कोकाटे आक्रमक होताना दिसला आणि त्याने सिकंदरच्या मानेवर वारंवार प्रहार केल्याचे दिसून आले. संयम राखत सिकंदर शेखने त्याला प्रतिकार केला; परंतु परिस्थिती चिघळत असतानाच माऊली कोकाटेचा एक समर्थक अचानक आखाड्यात शिरून सिकंदरवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे काही काळ गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली आणि प्रेक्षकांची गर्दी आखाड्यात उतरली.
घटनेची तीव्रता लक्षात घेऊन आयोजक पंच तात्काळ घटनास्थळी पोहोचले व दोन्ही पैलवानांना बाजूला नेण्यात आले. संभाव्य वाद वाढू नये म्हणून सिकंदरचे गुरू विशाल हारगुळे स्वतः मैदानात उतरले आणि पुन्हा कुस्ती सुरू करण्यात आली. तथापि, अखेरपर्यंत कोणताही निर्णायक निकाल लागला नाही.

परिस्थितीचा आढावा घेऊन आयोजकांनी कुस्ती सोडवून दोन्ही पैलवानांना संयुक्त विजेते घोषित केले. या निर्णयानंतर सोशल मीडियावर कुस्तीप्रेमींनी नाराजी व्यक्त केली आहे. अनेकांनी माऊली कोकाटेवर कुस्तीऐवजी मारामारी केल्याचा आरोप करत टीका केली आहे, तर काहींनी सुरुवातीपासून बचावात्मक भूमिका घेतल्याचीही नोंद केली आहे.

दरम्यान, सामन्यात हस्तक्षेप करून सिकंदर शेखवर हल्ला करण्याचा प्रयत्न करणाऱ्या तरुणावर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे. सिकंदर शेखने संयम राखल्यामुळे मोठा अनर्थ टळल्याचे मत व्यक्त केले जात आहे.




