पुण्यातील प्रसिद्ध कोहिनूर हॉटेलच्या मालकाकडे तब्बल १८ कोटींची खंडणी; धक्कादायक प्रकार उघड

पुणे : शहरातील चर्चित कोहिनूर हॉटेलचे मालक अली अलीअबकर जाफरी (वय 64) यांना तब्बल १८ कोटी रुपयांची खंडणी मागण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणामुळे व्यावसायिक वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. फिर्यादीत म्हटले आहे की, हॉटेल मालक जाफरी भारतीय नागरिक नसून बनावट कागदपत्रांच्या आधारे भारतात राहत आहेत, असा अर्ज पोलीस व निवडणूक अधिकाऱ्यांकडे सादर करण्यात आला होता. हा अर्ज मागे घेण्यासाठी आरोपी समीर मोतीलाल मुजुमदार (49) यांनी जाफरी यांच्यावर दीर्घकाळ दबाव आणून १८ कोटी रुपयांची मागणी केली. याशिवाय, पैसे न दिल्यास “पोलिसांमार्फत सतत त्रास देऊ, तसेच मालमत्ता विकायला लावू”, अशी गंभीर धमकी दिल्याचेही फिर्यादीत स्पष्ट करण्यात आले आहे.
हा प्रकार 2024 पासून आजपर्यंत एम. जी. रोडवरील अकबर रेडियन प्लाझा, ऑफिस नंबर 203 आणि 204 येथे घडल्याचे नमूद आहे. आरोपीने विविध मार्गांनी फिर्यादीवर मानसिक दबाव निर्माण केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी लष्कर पोलीस ठाण्यात भादंवि कलम 308(2)(3) आणि 351(2)(3) अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला असून पोलीस पुढील तपास सुरू आहे.




