देहूरोड परिसरात डॉ. सोलोमोनराज भंडारे यांच्या नेतृत्वाखाली तीव्र चक्का जाम आंदोलन
मृतका मैरी मल्लेश तेलगू ला न्याय मिळावा अशी जोरदार मागणी.....

पिंपरी चिंचवड : देहूरोड परिसरात डॉ. सोलोमोनराज भंडारे यांच्या नेतृत्वाखाली तीव्र चक्का जाम आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात मृतकाचे परिवार व नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. घोषणाबाजी करत “मृतका मैरीला न्याय मिळालाच पाहिजे”, “नरधमांना फाशी द्या” अशा मागण्या करण्यात आल्या. ही घटना वाकड येथील एम्बिएन्स लॉज येथे घडली, जिथे 26 वर्षीय युवती मैरी मल्लेश तेलगू हिची तिचाच मित्र दिलावर रामशकतसिंह (वय 25, रा. पिसोली, कोंढवा, पुणे) याने धारदार शस्त्राने निर्घृण हत्या केली.
ही घटना शनिवार, 11 ऑक्टोबर रोजी दुपारी 3 ते 4 या वेळेत घडली.
हत्या केल्यानंतर आरोपी थेट कोंढवा पोलिस ठाण्यात गेला आणि त्याने गुन्ह्याची कबुली दिली. पोलिसांनी तत्काळ वाकड पोलिसांना कळवून आरोपी त्यांच्या ताब्यात दिला. ही माहिती शीतलानगर, देहूरोड परिसरात पोहोचताच एकच खळबळ उडाली, कारण मृतका मैरी तिथे राहत होती.
सोमवार, 13 ऑक्टोबर रोजी सकाळी 11 वाजता देहूरोड कब्रस्तानात तिचा अंत्यसंस्कार होणार होता. परंतु त्यावेळी मोठ्या प्रमाणात नागरिक व सामाजिक कार्यकर्ते जमले आणि “मैरीला न्याय द्या”, “आरोपीला फाशी द्या”, “आरोपीला आम्हाला सोपवा” अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला.
डॉ. सोलोमोनराज भंडारे यांनी सांगितले की : “हे केवळ एक खून नाही, तर समाजातील महिलांच्या सुरक्षेवरील मोठा प्रश्न आहे. आरोपीला फाशीची शिक्षा देऊनच न्याय मिळेल. प्रशासनाने कठोर कारवाई केली नाही, तर आमचा संघर्ष आणखी तीव्र होईल.”
घटनेची गंभीरता लक्षात घेऊन वाकड आणि देहूरोड पोलिस अधिकारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी आंदोलनकर्त्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला. नागरिकांनी ठोस आश्वासनाची मागणी केली — “भविष्यात आमच्या मुलींना सुरक्षितता मिळेल, याची हमी द्या.” शेवटी पोलिस अधिकाऱ्यांनी कडक कारवाईचे आश्वासन दिले आणि मृतका मैरी मल्लेशला न्याय मिळवून देण्याची ग्वाही दिली. त्यानंतर आंदोलन शांततेत संपले.
तथापि, आंदोलनामुळे वाहतूक ठप्प झाली आणि अंतिम संस्कारात सुमारे पाच तास उशीर झाला.
या संपूर्ण घटनेदरम्यान पोलिस अधिकारी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी नागरिकांना संयम राखण्याचे आवाहन केले.




