उदगीरमध्ये विवाहितेला जिवंत जाळून ठार मारल्याचा आरोप; पतीसह सासू-सासऱ्यांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल
उदगीरमध्ये विवाहितेला जिवंत जाळून ठार मारल्याचा आरोप; पतीसह सासू-सासऱ्यांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल

उदगीर, लातूर: उदगीर शहरात एका ३६ वर्षीय विवाहितेचा जिवंत जाळून खून केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी पती, सासू आणि सासऱ्यांविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) अंतर्गत खुनासह विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.
मृत महिलेचे नाव तस्लिम शफी कुरेशी (वय ३६) असे असून, त्यांचा विवाह २०१९ मध्ये झाला होता. फिर्यादीनुसार, विवाहानंतर काही काळ सर्व काही सुरळीत असताना नंतर पती, सासू आणि सासरे यांनी चारित्र्यावर संशय घेणे, घरगुती कारणांवरून मानसिक व शारीरिक छळ करणे तसेच माहेरहून दोन लाख रुपये आणण्याची मागणी करत वारंवार त्रास दिला.

घटनेच्या दिवशी तस्लिम यांनी आपल्या वडिलांना फोन करून पतीकडून मारहाण होत असल्याची माहिती देत तातडीने येण्याची विनंती केली. त्यानंतर काही वेळातच त्यांनी पुन्हा फोन करून, “मला वाचवा… ते मला जाळत आहेत,” असा आर्त संदेश दिला. कुटुंबीय घटनास्थळी पोहोचले असता त्या गंभीररीत्या भाजलेल्या अवस्थेत आढळल्या. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
मृत महिलेच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीवरून उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ८५ (क्रूरता), १०३(१) (खून) आणि ३(५) अन्वये पती, सासू आणि सासऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणात मृत महिलेचा शेवटचा फोन कॉल हा महत्त्वाचा पुरावा मानला जात असून, पोलीस सर्व बाजूंनी तपास करत आहेत. आरोपींना अटक करण्याची प्रक्रिया सुरू असून, घटनेमुळे उदगीर परिसरात संताप आणि हळहळ व्यक्त होत आहे.




