E-Paperक्राइमदुनियादेशमहाराष्ट्रलोकल न्यूज़

धावत्या लोकलमध्ये तरुणाची हत्या करणारा मुख्य आरोपी काही तासांत अटकेत; यूपीला पळून जाण्याचा डाव पोलिसांनी हाणून पाडला

मुंबई, दि. 24: चर्चगेट–नालासोपारा फास्ट लोकलमध्ये दरवाजा बंद करण्याच्या किरकोळ वादातून २२ वर्षीय मयंक लोहार याची चाकूने भोसकून हत्या करणाऱ्या मुख्य आरोपीला रेल्वे पोलिसांनी अवघ्या काही तासांत अटक केली आहे. रोशन सुवर्णा (वय ३०) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, काल रात्री घडलेल्या या गंभीर घटनेनंतर आरोपी बोरिवली रेल्वे स्थानकावर उतरून फरार झाला होता. पोलिस तपासातून समोर आले की, तो उत्तर प्रदेशला पळून जाण्याच्या तयारीत होता. मात्र, बोरिवली रेल्वे पोलिसांनी तातडीने सहा विशेष पथके तयार करून तांत्रिक तपास आणि आरोपीच्या कुटुंबीयांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे शोधमोहीम सुरू केली.

या कारवाईदरम्यान आरोपी उत्तर प्रदेशकडे रवाना होण्यापूर्वीच कुर्ला परिसरातून त्याला ताब्यात घेण्यात आले. जलद गतीने तपास करत आरोपीला अटक करणाऱ्या रेल्वे पोलिसांच्या कामगिरीचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.

या घटनेमुळे मुंबई लोकलमधील प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. क्षुल्लक वादातून थेट प्राणघातक हल्ला करून एका तरुणाचा जीव घेण्यात आल्याने नागरिकांमध्ये संतापाची भावना व्यक्त होत आहे. मुंबईतील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी अशा गंभीर गुन्ह्यांवर कठोर कारवाई होणे आवश्यक असल्याची मागणी होत आहे.

संबंधित आरोपीविरुद्ध कायद्यानुसार कठोर कारवाई करण्यात येणार असून पुढील तपास रेल्वे पोलिसांकडून सुरू आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!