आकुर्डीतील पदपथ दुचाकी पार्किंगच्या विळख्यात! पादचाऱ्यांनी चालायचे कुठून? बेकायदा पार्किंगमुळे नागरिकांची गैरसोय

प्रतिनिधी (प्रसाद गव्हाणे): पिंपरी-चिंचवड मधील आकुर्डी येथील प्रसन्न चौक परिसरात पदपथावर दुचाकींचे मोठ्या प्रमाणात पार्किंग केले जात असल्याचे चित्र समोर आले आहे. CEAT Shoppe आणि K.P.T. Motors परिसरातील पदपथावर दुचाकी उभ्या केल्यामुळे पादचाऱ्यांना चालण्यासाठी जागाच उरलेली नाही. पदपथ हा पादचाऱ्यांच्या सुरक्षित ये-जा करण्यासाठी असताना त्यावर वाहनांचे पार्किंग केले जात असल्याने ज्येष्ठ नागरिक, महिला, लहान मुले आणि विद्यार्थ्यांना रस्त्यावरून चालण्याची वेळ येत आहे. त्यामुळे अपघाताचा धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
वाहतूक नियमांनुसार पदपथावर वाहन उभे करून पादचाऱ्यांचा मार्ग अडविणे हे नियमांचे उल्लंघन ठरू शकते. असे असताना संबंधित ठिकाणी वाहनांचे पार्किंग कसे केले जात आहे, असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. संबंधित वाहतूक पोलीस विभाग आणि महापालिका प्रशासनाने या प्रकाराची तातडीने दखल घेऊन बेकायदा पार्किंगवर कारवाई करावी, तसेच पदपथ पादचाऱ्यांसाठी मोकळा करून द्यावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.




