स्वयंघोषित ज्योतिषी कॅप्टन अशोक खरात अटकेत; लैंगिक शोषण व कोट्यवधींच्या संपत्तीचा उलगडा
स्वयंघोषित ज्योतिषी कॅप्टन अशोक खरात अटकेत; लैंगिक शोषण व कोट्यवधींच्या संपत्तीचा उलगडा

नाशिक: स्वयंघोषित ज्योतिषी कॅप्टन अशोक खरात अटकेत; लैंगिक शोषण व कोट्यवधींच्या संपत्तीचा उलगडा
नाशिक येथे स्वयंघोषित ज्योतिषी कॅप्टन अशोक खरात याला एका ३५ वर्षीय विवाहित महिलेवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी गुन्हे शाखेकडून अटक करण्यात आली आहे. या कारवाईनंतर त्याच्या आर्थिक व्यवहारांबाबत आणि संपत्तीबाबत धक्कादायक माहिती समोर येत आहे.

तक्रारदार महिलेच्या म्हणण्यानुसार, गेल्या दोन वर्षांपासून आरोपीने अंधश्रद्धा आणि भीतीचे वातावरण निर्माण करून तिचे शोषण केले. “तुझ्या पतीच्या जीवाला धोका आहे,” अशी भीती दाखवत आरोपीने तिच्यावर वारंवार अत्याचार केल्याचा आरोप आहे. अखेर पीडितेने पोलिसांकडे धाव घेतल्यानंतर मंगळवारी उशिरा रात्री कर्मयोगीनगर येथील निवासस्थानातून त्याला ताब्यात घेण्यात आले.

तपासादरम्यान पोलिसांना आरोपीच्या पेनड्राईव्हमध्ये अनेक आक्षेपार्ह व्हिडिओ सापडले असून, या प्रकरणाची व्याप्ती अधिक वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून न्यायालयाने आरोपीला सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
प्राथमिक तपासात असेही उघड झाले आहे की, आरोपीने ज्योतिष आणि अंकशास्त्राच्या माध्यमातून गेल्या १५ वर्षांत मोठ्या प्रमाणात संपत्ती उभी केली आहे. नाशिकमधील विविध ठिकाणी त्याच्या नावावर व कुटुंबीयांच्या नावे मोठ्या प्रमाणावर जमीन खरेदी करण्यात आल्याचे समोर आले आहे. पाथर्डी परिसरात सुमारे ३० एकर जमीन असून तिची किंमत अंदाजे १५० कोटी रुपये असल्याचे सांगितले जाते.
तसेच कहांडळवाडी आणि मीरगाव परिसरात मिळून सुमारे ४५ एकर जमीन आणि आलिशान फार्महाऊस असल्याची माहिती समोर आली आहे. या सर्व मालमत्ता आरोपीने स्वतःसह पत्नी व कुटुंबीयांच्या नावावर नोंदवल्याचे तपासात दिसून आले आहे.
आरोपीने विविध क्षेत्रातील प्रभावशाली व्यक्तींशी संपर्क वाढवून आपले जाळे निर्माण केले होते, अशीही माहिती पुढे येत आहे. पोलिसांकडून या प्रकरणाचा सखोल तपास सुरू असून आणखी काही धक्कादायक बाबी उघड होण्याची शक्यता नाकारता येत नाही.




