पिंपरी-चिंचवडमध्ये HSRP प्लेट चा गोंधळ: एकाच दुचाकीसाठी समोर आणि मागे वेगवेगळ्या नंबर प्लेट्स,आरटीओ प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह

१५ मे, २०२५ | पुणे
गाड्या चोरीला जाण्याचे प्रमाण रोखण्यासाठी महाराष्ट्र सरकारने हाय सेक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट (HSRP) सर्व वाहनांसाठी बंधनकारक केल्या आहेत. ही प्रक्रिया संपूर्णपणे ऑनलाइन पद्धतीने — नोंदणी, पेमेंट आणि अपॉइंटमेंट ठरविणे अशा टप्प्यांमध्ये — राबवली जात आहे. मात्र पिंपरी-चिंचवडमधील एका घटनेमुळे या प्रक्रियेतील त्रुटी समोर आल्या असून नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.
पिंपळे गुरव येथील रहिवासी महेश आगम यांना ऑनलाइन अर्ज केल्यानंतर त्यांच्या दुचाकीसाठी दोन वेगवेगळ्या नंबर प्लेट्स मिळाल्या. समोरील प्लेटवर MH 14 BN 8927 असा योग्य क्रमांक असताना, मागील प्लेटवर MH 20 BN 8927 असा चुकीचा क्रमांक होता.
अपॉइंटमेंटच्या दिवशी ही चूक लक्षात आल्यानंतर आगम यांनी तात्काळ तक्रार केली. इंस्टॉलेशन करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी चूक मान्य करत ती काही तासांत सुधारण्याचे आश्वासन दिले. मात्र, आगम यांनी ही चूक गंभीर असल्याचे सांगत राज्य सरकार आणि त्यांनी नेमलेल्या खासगी कंपनीवर तीव्र नाराजी व्यक्त केली.”माझ्या गाडीला दिलेल्या समोरच्या आणि मागच्या प्लेट्स वेगवेगळ्या आहेत, ही केवळ टायपिंगची चूक नाही, तर गंभीर दुर्लक्ष आहे. सरकारने निवडलेल्या कंपनीकडून ही चूक झाली आहे. नागरिकांना विनाकारण त्रास सहन करावा लागत आहे. अनेक ठिकाणी लोकांच्या इंस्टॉलेशनवेळी वादही होत आहेत,” असे आगम यांनी सांगितले.राज्य सरकारने एचएसआरपी तयार करून बसवण्यासाठी एक खासगी कंपनीला कंत्राट दिले असून संपूर्ण प्रक्रिया ऑनलाइन करण्यात आली आहे. मात्र या घटनेमुळे छपाई किंवा पॅकेजिंग प्रक्रियेत दुर्लक्ष होत असल्याचे स्पष्ट झाले आहे.





