खुनाच्या कटावर काळेवाडी पोलिसांचा घाव; थेरगावमध्ये ६ जण रंगेहाथ पकडले

पिंपरी-चिंचवड :- वाढत्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर काळेवाडी पोलिसांनी मोठी कारवाई करत खुनाचा कट उधळून लावला आहे. थेरगाव परिसरात एका तरुणाचा खून करण्याच्या तयारीत असलेल्या सहा जणांच्या टोळीला पोलिसांनी रंगेहाथ पकडले. ही कारवाई शनिवारी (२५ एप्रिल) पहाटे सुमारे ५.३० वाजण्याच्या सुमारास बारणे कॉर्नर येथील मोकळ्या मैदानात करण्यात आली.
अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये ऋषिकेश महादेव चव्हाण (२७), ऋषिकेश हरी आटोळे (२३), करण उमेश वाघमारे (२४), अमित मधुकर कदम (१८), यश राहुल साळवे (१८) आणि श्रवण रवी दोडमनी (२०) यांचा समावेश आहे. या प्रकरणी पोलीस शिपाई रमेश ब्राह्मण यांनी काळेवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी विकी रामप्रसाद मल या तरुणाचा खून करण्याच्या उद्देशाने एकत्र जमले होते. याबाबत गुप्त माहिती मिळताच पोलिसांनी सापळा रचून सर्वांना ताब्यात घेतले. या कारवाईदरम्यान आरोपींकडून एक गावठी पिस्तुल, एक जिवंत काडतूस आणि दोन लोखंडी कोयते असा सुमारे ९३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
सध्या काळेवाडी पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.




