नसरापूर घटनेतील नराधमाचे वकीलपत्र नाकारले – पुणे बार असोसिएशनच्या निर्णयाचे सर्वत्र स्वागत
नसरापूर घटनेतील नराधमाचे वकीलपत्र नाकारले – पुणे बार असोसिएशनच्या निर्णयाचे सर्वत्र स्वागत

पुणे दि. 9 (प्रतिनिधी):
नसरापूर येथे चिमुकलीवर झालेल्या अमानुष अत्याचाराच्या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरला असून समाजमन संतप्त झाले आहे. या पार्श्वभूमीवर पुणे बार असोसिएशनने आरोपी नराधमाचे वकीलपत्र कोणत्याही वकिलाने स्वीकारू नये, असा घेतलेला धाडसी आणि ऐतिहासिक निर्णय समाजात सकारात्मक संदेश देणारा ठरला आहे.
पुणे बार असोसिएशनच्या या निर्णयाचे राष्ट्रीय पॅरा दिव्यांग नेमबाज खेळाडू रफीक लतीफ खान यांनी जाहीर स्वागत करत संघटनेचे मनःपूर्वक आभार मानले आहेत. त्यांनी सांगितले की, “अशा घृणास्पद कृत्य करणाऱ्यांना कोणत्याही प्रकारचा सामाजिक किंवा नैतिक पाठिंबा मिळता कामा नये. पुणे बार असोसिएशनने घेतलेली भूमिका ही न्यायव्यवस्थेवरील जनतेचा विश्वास अधिक दृढ करणारी आहे.”

नसरापूर येथील या दुर्दैवी घटनेने संपूर्ण राज्यात संतापाची लाट उसळली आहे. पीडित चिमुकलीला तातडीने न्याय मिळावा आणि आरोपीला कठोरातील कठोर शिक्षा व्हावी, अशी सर्वसामान्य नागरिकांची भावना आहे. अशा वेळी पुणे बार असोसिएशनच्या निर्णयामुळे पीडित कुटुंबाला मोठा मानसिक आधार मिळाला असल्याचेही बोलले जात आहे.
समाजातील विविध स्तरांतून या निर्णयाचे स्वागत होत असून, महिलांवरील आणि बालकांवरील अत्याचारांविरोधात कठोर भूमिका घेण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.




