भोंदू बाबा आरोपी ऋषिकेश वैद्य आज न्यायालयात हजर
भोंदू बाबा आरोपी ऋषिकेश वैद्य आज न्यायालयात हजर

पुणे, दि. 29/03/2026 पुण्यातून एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. स्वतःला ‘महादेवाचा अवतार’ असल्याचे भासवून एका ३५ वर्षीय महिलेची फसवणूक व लैंगिक अत्याचार केल्याच्या आरोपाखाली ऋषिकेश वैद्य याला पोलिसांनी अटक केली आहे.
सदर गुन्हा सुरुवातीला वसई येथे नोंदविण्यात आला होता. पुढील तपासासाठी हा गुन्हा पुण्यातील हडपसर पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे. आज आरोपीला लष्कर न्यायालयात हजर करण्यात आले असता, पोलिसांनी पुढील तपासासाठी १४ दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी न्यायालयाकडे केली आहे.
प्राथमिक तपासात आरोपीने धार्मिक भावना व अंधश्रद्धेचा गैरफायदा घेत महिलेला जाळ्यात ओढल्याचे समोर येत आहे. या प्रकरणामुळे समाजात भोंदूगिरीच्या वाढत्या प्रकारांबाबत पुन्हा एकदा गंभीर चिंता व्यक्त केली जात आहे.
पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत असून, अशा प्रकारच्या फसवणुकीपासून नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. कोणत्याही व्यक्तीच्या दैवी दाव्यांवर आंधळा विश्वास न ठेवता, संशयास्पद प्रकार आढळल्यास त्वरित पोलिसांना माहिती द्यावी, असेही आवाहन करण्यात आले आहे.




