पुणे शिक्षणाचे माहेरघर की गुंडागर्दीचे केंद्र?

पुणे : एकेकाळी पुणे शहराला “शिक्षणाचे माहेरघर” म्हणून ओळखले जात होते. मात्र, अलीकडील काळात शहरात वाढत्या गुंडागर्दी, टोळी युद्धे आणि फायरिंगच्या घटनांमुळे पुण्याची ओळख बदलत असल्याची भावना सर्वसामान्य नागरिकांमध्ये निर्माण होत आहे. पोलिस प्रशासनाने अनेक कुख्यात गुन्हेगार आणि टोळ्यांवर कठोर कारवाई करत त्यांच्यावर मोक्का अंतर्गत गुन्हे दाखल केले आहेत. अनेक गँगस्टर्सना तुरुंगातही पाठविण्यात आले आहे. तरीसुद्धा शहरातील फायरिंग, खंडणी, मारामारी आणि गुंडगिरीच्या घटना थांबताना दिसत नाहीत.
यामुळे नागरिकांमध्ये प्रश्न उपस्थित होत आहेत की, एवढ्या मोठ्या प्रमाणावर कारवाया करूनही गुन्हेगारीवर अपेक्षित नियंत्रण का येत नाही? पोलिस प्रशासनाची कारवाई पुरेशी प्रभावी ठरत आहे का, की गुन्हेगारांमध्ये कायद्याची भीती राहिलेली नाही?
शहरात सातत्याने घडणाऱ्या गुन्हेगारी घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, पोलिस प्रशासनाने अधिक कठोर आणि परिणामकारक उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.
(संपादकीय मत: कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिस प्रशासन, स्थानिक प्रशासन आणि नागरिक यांचे संयुक्त प्रयत्न आवश्यक आहेत.)




