E-Paperhttps://mvsnews.info/wp-content/uploads/2024/01/jjujuu.gifटेक्नोलॉजीटॉप न्यूज़महाराष्ट्रयुवाराजनीतिराज्यलोकल न्यूज़

चलो मोशी कचरा डेपो प्रदूषणविरोधात ग्रामस्थांचा निर्णायक लढा

मोशी: पिंपरी-चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील मोशी येथील मुख्य कचरा डेपोच्या विरूद्ध आता स्थानिक नागरिक आणि विविध सामाजिक संघटनांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. मोशी परिसराला प्रदूषणमुक्त करण्यासाठी आणि नागरिकांच्या आरोग्याच्या संरक्षणासाठी आगामी गुरुवार, दिनांक ५ नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळी ठीक ९:०० वाजता मोशी येथील बैलगाडा घाटाजवळील, कचरा डेपोच्या बाजूच्या मैदानावर एका भव्य ‘इशारा आंदोलना’चे आयोजन करण्यात आले आहे.
“एकच आवाज स्वच्छ हवा, स्वच्छ पाणी, निरोगी जीवन आणि प्रदूषणमुक्त मोशी!” अशा घोषणा देत स्थानिक ग्रामस्थांनी ‘चलो मोशी कचरा डेपो’ची हाक दिली आहे.
आंदोलकांच्या प्रमुख मागण्या खालीलप्रमाणे आहेत:
१. कचरा डेपोचे विभाजन: मोशी येथील कचरा डेपोवरील भार कमी करण्यासाठी त्याचे तातडीने १० क्षेत्रीय कार्यालयांच्या स्तरावर विभाजन करण्यात यावे.
२. बाधितांना मदत व कारवाई: कचरा डेपोमध्ये झालेल्या दुर्दैवी दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियांना तातडीने आर्थिक मदत देण्यात यावी, तसेच यासाठी कारणीभूत असणारे दोषी प्रशासकीय अधिकारी आणि संबंधित कंपनीवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी.
३. इंद्रायणी नदीचे प्रदूषण थांबवणे: मोशी कचरा डेपोतून निघणारे घातक रसायनमिश्रित दूषित पाणी (लीचेट) थेट नाल्यांद्वारे पवित्र इंद्रायणी नदीत मिसळत आहे. यामुळे नदीचे पाणी मोठ्या प्रमाणावर दूषित होत असून हे प्रदूषण त्वरित थांबवण्यात यावे.
सर्व स्तरांतून पाठिंबा आणि एकत्र येण्याचे आवाहन
या आंदोलनाचे आयोजन समस्त ग्रामस्थ मोशी, आदर्श नगर, गंधर्व नगरी, मोशी प्राधिकरण, डुडुळगाव, चोविसावाडी, जाधववाडी, इंद्रायणी नगर येथील रहिवासी, सर्व सोसायटी धारक आणि श्री क्षेत्र आळंदी येथील सर्व वारकरी संप्रदाय यांच्या वतीने संयुक्तपणे करण्यात आले आहे.
आपल्या पुढच्या पिढीच्या आरोग्यासाठी आणि सुरक्षिततेसाठी माता-भगिनींसह सर्व नागरिकांनी मोठ्या संख्येने घराबाहेर पडून या आंदोलनात सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!