पिंपरी कॅम्पमध्ये वॉटर मीटर चोरीचे सत्र?

पिंपरी-चिंचवड :पिंपरी कॅम्प परिसरातील सी ब्लॉक क्रमांक ७ समोर, प्रेम प्रकाश मंदिराच्या बाजूला वॉटर मीटर चोरीची घटना समोर आली आहे. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले असून, त्यामध्ये एक अनोळखी व्यक्ती वॉटर मीटरजवळ दिसून येत आहे. मात्र या व्यक्तीची ओळख अद्याप निश्चित झालेली नसून, चोरीच्या घटनेबाबत अधिकृत पुष्टी होणे बाकी आहे.
स्थानिक नागरिकांकडून मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या काही दिवसांत परिसरातील ३० ते ४० वॉटर मीटर चोरीला गेल्याचा दावा केला जात आहे. वॉटर मीटर चोरी झाल्यानंतर संबंधित सर्वसामान्य नागरिकांना नवीन मीटर व इतर खर्चासाठी सुमारे ₹३,००० ते ₹४,००० पर्यंतचा आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
वॉटर मीटर चोरीच्या वाढत्या घटनांमुळे नागरिकांमध्ये चिंता निर्माण झाली आहे. त्यामुळे महापालिका प्रशासन आणि पोलीस प्रशासनाने या प्रकाराची गांभीर्याने दखल घेऊन परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासावे, चोरीच्या घटनांची नोंद घ्यावी आणि दोषींवर योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
दरम्यान, वॉटर मीटर चोरीच्या ३० ते ४० घटनांबाबत अधिकृत आकडेवारी व पोलिसांकडून पुष्टी अद्याप उपलब्ध झालेली नाही.





