मुस्लिम समाजाचा १२ जूनला महापालिकेवर भव्य मोर्चा मुस्लिम धार्मिक स्थळांवरील कारवाईविरोधात धरणे आंदोलन;

प्रतिनिधी पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरातील मुस्लिम धार्मिक स्थळांवर प्रशासनाकडून सुरू असलेल्या कारवायांविरोधात मुस्लिम समाज, विविध सामाजिक संघटना, धर्मगुरू आणि पदाधिकाऱ्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर शुक्रवार, दि. १२ जून २०२६ रोजी दुपारी २ वाजता पिंपरी-चिंचवड महानगरपालिका भवनासमोर भव्य धरणे आंदोलन व मोर्चा काढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
यासंदर्भात आज पिंपरी येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक उद्यानात शहरातील प्रमुख मुस्लिम पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते, धर्मगुरू तसेच विविध संघटनांच्या प्रतिनिधींची महत्त्वपूर्ण रणनीती बैठक पार पडली. बैठकीत प्रशासनाकडून धार्मिक स्थळांवर करण्यात येत असलेल्या कारवायांचा तीव्र निषेध करण्यात आला.
उपस्थितांनी प्रशासनाने संबंधित घटकांना विश्वासात न घेता आणि संवेदनशील विषयांवर एकतर्फी भूमिका घेतल्याचा आरोप केला. धार्मिक भावना दुखावणाऱ्या कारवाया तात्काळ थांबवून संवादाच्या माध्यमातून प्रश्न सोडवावेत, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
बैठकीत सर्वानुमते ठराव मंजूर करून दि. १२ जून रोजी महापालिकेसमोर लोकशाही मार्गाने निषेध नोंदवण्यासाठी धरणे आंदोलन आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला. शहरातील मुस्लिम धार्मिक स्थळांचे संरक्षण, प्रशासनाच्या कारवाईचा निषेध आणि संबंधित प्रश्नांवर सकारात्मक तोडगा काढण्याच्या मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात येणार असल्याचे आयोजकांनी स्पष्ट केले.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी शहरातील सर्व समाजबांधव, सामाजिक संघटना, धार्मिक संस्था आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी होऊन आपला लोकशाही पद्धतीने निषेध नोंदवावा, असे आवाहन केले.
दरम्यान, धार्मिक स्थळांच्या प्रश्नावरून शहरातील सामाजिक आणि राजकीय वातावरण तापू लागले असून, दि. १२ जून रोजी होणाऱ्या आंदोलनाकडे संपूर्ण पिंपरी-चिंचवडचे लक्ष लागले आहे. प्रशासन आणि आंदोलनकर्त्यांमधील पुढील भूमिका काय असेल, याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.






