न्यू इंग्लिश स्कूल जुनियर कॉलेज नेरचे मुख्याध्यापक शौकतमिया जहागिरदार यांचा सत्कार

नेर, दि. 30 मे 2026 : न्यू इंग्लिश स्कूल जुनियर कॉलेज नेर येथील मुख्याध्यापक मा. शौकतमिया महेमुदमिया जहागिरदार यांनी प्रदीर्घ, समर्पित आणि गौरवशाली शैक्षणिक सेवेनंतर आज सेवानिवृत्ती स्वीकारली. यानिमित्त शाळेत आयोजित करण्यात आलेल्या भावपूर्ण सत्कार समारंभात शिक्षक, विद्यार्थी, पालक, माजी विद्यार्थी व मान्यवरांनी त्यांच्या कार्याचा गौरव करत कृतज्ञता व्यक्त केली.
शौकतमिया जहागिरदार यांचे या शाळेशी अतूट नाते आहे. त्यांनी याच विद्यालयात आपले माध्यमिक शिक्षण पूर्ण केले. त्यांचे वडील स्व. महेमुदमिया जहागिरदार हे याच शाळेत क्रीडा शिक्षक म्हणून कार्यरत होते. त्यांनी विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाबरोबरच शिस्त, संस्कार आणि क्रीडाप्रेम रुजवून आदर्श शिक्षक म्हणून लौकिक मिळविला होता.
वडिलांकडून मिळालेला सेवाभाव आणि संस्कारांचा वारसा जपत शौकतमिया जहागिरदार यांनी 17 नोव्हेंबर 1995 मध्ये क्रीडा शिक्षक म्हणून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. आपल्या मेहनती, कर्तव्यनिष्ठा आणि विद्यार्थ्यांप्रती असलेल्या जिव्हाळ्यामुळे त्यांनी शाळेला क्रीडा क्षेत्रात अनेक उल्लेखनीय यश मिळवून दिले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक विद्यार्थ्यांनी जिल्हा, विभागीय आणि राज्यस्तरीय स्पर्धांमध्ये यश संपादन करून शाळेचे नाव उज्ज्वल केले.
शिक्षक, विद्यार्थी, पालक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांमध्ये ते आदर्श शिक्षक, कुशल प्रशासक आणि प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखले जात होते. त्यांच्या नेतृत्वाखाली शाळेच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळाली.
सेवानिवृत्ती निमित्त आयोजित सत्कार समारंभात उपस्थित मान्यवरांनी त्यांच्या शैक्षणिक, सामाजिक व क्रीडा क्षेत्रातील योगदानाचा गौरव केला. यावेळी शाळा परिवाराच्या वतीने त्यांना शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले. उपस्थितांनी त्यांच्या दीर्घ आणि निष्ठावान सेवेसाठी मनःपूर्वक आभार व्यक्त करत भावी आयुष्यासाठी निरोगी, आनंदी व यशस्वी जीवनाच्या शुभेच्छा दिल्या.
शौकतमिया जहागिरदार यांनी आपल्या कार्यातून निर्माण केलेला आदर्श आणि मूल्यांची परंपरा भावी पिढ्यांसाठी प्रेरणादायी ठरेल. त्यांच्या योगदानाची नोंद न्यू इंग्लिश स्कूल जुनियर कॉलेजच्या इतिहासात कायम अभिमानाने घेतली जाईल, अशा भावना यावेळी व्यक्त करण्यात आल्या.






