पुण्यात अल्पवयीन मुलींवरील अत्याचारांची मालिका; समाजात भीतीचे सावट
पुण्यात अल्पवयीन मुलींवरील अत्याचारांचा कहर; सलग घटनांनी समाज हादरला, कठोर कारवाईची मागणी तीव्र

पुणे जिल्ह्यात अल्पवयीन मुलींवर होणाऱ्या अत्याचारांच्या घटनांमध्ये चिंताजनक वाढ होत असल्याचे समोर येत आहे. चाकणनंतर नसरापूर आणि ५ मे रोजी पर्वती येथे ९ वर्षांच्या मुलीवर झालेल्या अमानुष घटनेने संपूर्ण समाज हादरला आहे. या सलग घडणाऱ्या घटना केवळ कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न नसून मानवतेलाच काळिमा फासणाऱ्या ठरत आहेत.
या पार्श्वभूमीवर नागरिकांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली असून प्रशासनाने तातडीने कठोर पावले उचलावीत, अशी जोरदार मागणी केली जात आहे. दोषींना कठोरात कठोर शिक्षा देण्यात यावी, अशी भावना सर्वसामान्यांमध्ये व्यक्त होत आहे.
दरम्यान, या घटनांमुळे महिलांमध्ये व पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून “मुलींना सुरक्षित वातावरण मिळणार का?” असा सवाल उपस्थित केला जात आहे. काही माता-भगिनींनी तर “मुलीला जन्म द्यावा की नाही?” असा वेदनादायी प्रश्न उपस्थित केला आहे. समाजातील सर्व घटकांनी एकत्र येऊन बालसुरक्षेबाबत जागरूकता वाढवण्याची आणि अशा गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी ठोस पावले उचलण्याची गरज व्यक्त होत आहे.




