रागा पॅलेसजवळ दुचाकी घसरून महिलेचा गंभीर अपघात!

पिंपरी चिंचवड प्रतिनिधी (फरीद शेख) : रागा पॅलेस परिसरात एका अज्ञात महिलेचा दुचाकी घसरल्याने गंभीर अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित महिला दुचाकीवरून जात असताना वाहन अचानक घसरल्याने ती गंभीर जखमी झाली. अपघातानंतर घटनास्थळी उपस्थित नागरिकांनी तात्काळ रुग्णवाहिका व पोलीस प्रशासनाला संपर्क साधला. मात्र, स्थानिकांच्या म्हणण्यानुसार रुग्णवाहिका आणि पोलीस घटनास्थळी पोहोचण्यासाठी सुमारे 30 ते 40 मिनिटांचा कालावधी लागला. दरम्यान, जमलेल्या नागरिकांनी मानवतेचा परिचय देत जखमी महिलेला मदत केली व रुग्णवाहिका आल्यानंतर तिला पुढील उपचारासाठी रुग्णालयात रवाना करण्यात आले.
महिलेची ओळख अद्याप पटलेली नसून तिच्यावर उपचार सुरू असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. अपघाताचे नेमके कारण आणि पुढील तपास पोलीस प्रशासनाकडून करण्यात येत आहे.




